सध्या देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई सुरू असताना, कोरपना शहरात एक गंभीर व संतापजनक प्रकार समोर आला आहे.
कोरपणा : येथील साईश्रदा पेट्रोल पंपावर नियमांचे उल्लंघन करून बॉटलमध्ये पेट्रोल देण्यात आल्याची घटना घडली आहे.
याच पेट्रोलचा वापर करून काही युवकांनी ते कॅरीबॅगमध्ये भरून स्फोट घडवून आणल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी ही घटना अत्यंत धोकादायक व निष्काळजीपणाचे उदाहरण ठरली आहे.
दरम्यान, संबंधित पेट्रोल पंप मालक हा एका राजकीय पक्षाशी संबंधित नेता असल्याची चर्चा असून, तो विरोधी पक्षाच्या नागरिकांना पेट्रोल-डिझेल देण्यास टाळाटाळ करतो, तसेच त्यांच्याशी अयोग्य वर्तन करून शिवीगाळ करतो, असे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.
अत्यावश्यक सेवांमध्ये असा भेदभाव करणे व नागरिकांशी गैरवर्तन करणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पेट्रोल पंप चालक व घटनेत सहभागी युवकांवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.