Home Breaking News पाणीटंचाईवर तातडीची उपाययोजना करा; कार्यान्वित नसलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करून नागरिकांना दिलासा...

पाणीटंचाईवर तातडीची उपाययोजना करा; कार्यान्वित नसलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करून नागरिकांना दिलासा द्या

122

पाणीटंचाईवर तातडीची उपाययोजना करा; कार्यान्वित नसलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करून नागरिकांना दिलासा द्या



आ. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश


वीज बिल प्रलंबितामुळे बंद पडलेल्या योजनांवर तोडगा; मुख्यमंत्र्यांकडे मुदतवाढ मागणार


आ.मुनगंटीवार यांचे दोन महिन्यांत सर्व योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश; टंचाई आराखडा व विशेष कृती कार्यक्रमावर भर


*चंद्रपूर – जिल्ह्यात वाढत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच कार्यान्वित नसलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करून जनतेला दिलासा द्यावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेत तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.*

या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी,संजय आष्टगी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे, संध्याताई गुरनुले तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ३३ पाणीपुरवठा योजनांपैकी अनेक योजना शेवटच्या टप्प्यात असून सुमारे ६ कोटी रुपयांचे वीज बिल प्रलंबित असल्यामुळे अनेक योजना ठप्प झालेल्या असल्याची माहिती बैठकीत समोर आली. याबाबत आ.मुनगंटीवार म्हणाले, थकीत विज बिल भरेपर्यंत येत्या सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मुदतवाढ मागविण्यात येणार आहे. तसेच योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी डीपीडीसीमधून स्वतंत्र शासन निर्णय काढण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
मतदारसंघातील कार्यान्विंत नसलेल्या पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती घेण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी देत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुल ग्रीड प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व २४ गावांच्या योजनेबाबत संबंधित अधिकारी व सरपंचांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिली.

यावेळी आ.मुनगंटीवार यांनी प्रत्येक गावासाठी आवश्यक निधीचा आढावा घेऊन नियोजन करण्याच्या सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागास दिल्या.पाणीपुरवठा योजनांकडे अत्यंत गंभीरतेने पाहण्याचे आ.मुनगंटीवार यांनी निर्देश देत, दोन महिन्यांत सर्व योजना कार्यान्वित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. कंत्राटदारांनी मुदतीत काम पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या.

कोठारी येथील काही वार्डांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची बाब निदर्शनास आली असून अशा इतर ठिकाणांची माहिती घेऊन आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याच्या सूचना आ.मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच हातपंप दुरुस्तीच्या तक्रारी ४८ तासांत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.

टंचाई काळात विहीर खोलीकरण, खाजगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विहीर व हातपंप, कुपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती आदी उपाययोजनांचा सविस्तर कार्यक्रम राबविण्याचे आ.मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी ३० जूनपर्यंतचा टंचाई आराखडा तयार करून सादर करावा, तसेच प्रत्येक गावासाठी स्वतंत्र माहितीपत्रक तयार करण्यावरही भर देण्यात आला.

विधानसभेत जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित ५०८ कोटी रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देत, ग्रामपंचायत स्तरावर तक्रार नोंदणीसाठी सूचना फलक लावण्यात यावे.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

*पाणीपुरवठा मंत्री यांच्याशी साधला दूरध्वनीद्वारे संवाद*
दर सोमवारी गटविकास अधिकारी स्तरावर पाणीपुरवठा विषयक संयुक्त बैठकींचे नियमित आयोजन सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढण्याची आवश्यकता असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here