“आई” फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था, घुग्घुस तर्फे स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाला गावातील जनसामान्यांच्या संबंधी निवेदन देण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस हे आधीच अति प्रदूषित शहर म्हणून कुप्रसिद्ध झाले असून येथे कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या बेफिकीर व मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू आहे. वे.को.ली. (WCL), लॉयड्स मेटल, ए.सी.सी., अदानी यांसारख्या मोठ्या उद्योगांकडून प्रचंड प्रमाणात वायू व धुळ प्रदूषण पसरवले जात असून याचा थेट परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे.
या कंपन्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली व मोठ्या पक्षांना निधी पुरवून स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचा गंभीर आरोप संस्थेने केला आहे. त्यामुळे प्रशासनही अनेक वेळा डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून सामान्य नागरिकांच्या जिवाची किंमत शून्य समजली जात आहे.
संस्थेने 27 मार्च रोजी स्थानीय प्रशासन व जिला प्रशासनला खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१) गावातील जड वाहतूक तात्काळ गावाबाहेर वळवावी. २) गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा द्याव्यात. ३) धुळ प्रदूषण रोखण्यासाठी नियमित पाण्याचा शिडकाव करावा. ४) रविवारी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य पार्किंग व्यवस्था करावी. ५) मुख्य चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. ६) राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नव्या बायपास मार्गावरच वळवावी. ७) स्टंटबाजी करणाऱ्या असामाजिक तत्वांवर कठोर कारवाई करावी. ८) मुख्य चौकातील अवैध गुटखा विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाई करावी.
या सर्व मागण्या या केवळ सुविधा नसून गावकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न असल्याचे संस्थेने ठामपणे नमूद केले आहे.
तसेच, जर प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केले तर मोठ्या कंपन्यांच्या विरोधात गावातून होणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद करून तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
“जनतेच्या जिवाशी खेळ थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा आक्रमक संदेश देत संस्थेने प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.