जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी घेतली निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक
चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीला वेग आला असून, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध विषयांच्या नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. ही बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, शुभम दांडेकर, अतुल जटाळे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर उपस्थित होते. याशिवाय दूरदृश्यप्रणालीद्वारे गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष आणि वर्धाचे संजीव जाधवर सहभागी झाले.
यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडण्याच्या सूचना दिल्या. तिन्ही जिल्ह्यांतील उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्या ठिकाणी सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आणि इतर आवश्यक सुविधा सक्षमपणे उपलब्ध ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाची पडताळणी करून तयारी पूर्ण ठेवावी, तसेच अचूक मतदार यादी तयार करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. नावांच्या अग्रक्रमानुसार मतदार यादी तातडीने चंद्रपूर येथे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत निवडणुकीच्या विविध टप्प्यांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला असून, पारदर्शक आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.