पेट्रोल-डिझेल टंचाई रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; काळाबाजार आणि साठेबाजीवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
चंद्रपूर, दि. २५ : पश्चिम आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, नागरिकांना नियमित इंधन पुरवठा मिळावा आणि काळाबाजार रोखता यावा यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी अचानक पेट्रोल पंपावर धडक देत पाहणी केली.
चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील Bharat Petroleum Corporation Limited च्या कोटपल्लीवार पेट्रोल पंपावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देत साठा रजिस्टर, दैनंदिन इंधन उपलब्धतेची माहिती आणि डिजिटल अॅपद्वारे नोंदींची तपासणी केली.
यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे का, गत आठवड्याच्या तुलनेत परिस्थितीत सुधारणा झाली का, वाहनांना किती मर्यादेत इंधन दिले जाते, शेवटचा टँकर कधी आला, ग्राहकांची गर्दी वाढली आहे का तसेच औद्योगिक जिल्हा असल्याने मोठ्या ट्रकांची इंधन भरण्याची व्यवस्था कशी केली जाते, याबाबत सविस्तर माहिती घेतली.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कॅन किंवा बाटलीमध्ये पेट्रोल-डिझेल विक्री करणे अनधिकृत असून अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही. तसेच पेट्रोल पंपावर दररोज उपलब्ध असलेल्या इंधन साठ्याची माहिती दर्शनी भागात लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पेट्रोल-डिझेलची काळाबाजारी किंवा अवैध साठेबाजी होणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहावे,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पेट्रोल पंप चालक व्ही. एम. कोटपल्लीवार यांनी सांगितले की, मागील आठवड्याच्या तुलनेत आता परिस्थितीत सुधारणा झाली असून पेट्रोल आणि डिझेलचे टँकर नियमित येत आहेत. अफवांमुळे काहीवेळा ग्राहकांची अचानक गर्दी होते, मात्र इंधन साठा पूर्णपणे संपण्याची वेळ सहसा येत नाही.
तसेच शहरातील बहुतांश जड वाहने आणि ट्रक शहराबाहेरील पंपांवरून इंधन भरत असल्याची माहिती त्यांनी दिली. आमच्या पंपावर कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल दिले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.