विजय वडेट्टीवारांना मोठा राजकीय धक्का? काँग्रेसचे ६० हून अधिक नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
विधान परिषद निवडणुकीपूर्वी पूर्व विदर्भात राजकीय भूकंपाची चर्चा; भाजपच्या रणनीतीमुळे काँग्रेसमध्ये खळबळ
चंद्रपूर / गडचिरोली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल ६० हून अधिक नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि काही महत्त्वाच्या नगरसेवकांचे मोबाईल फोन अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे सर्व लोकप्रतिनिधी कुठे गेले, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज्यातील १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात आहे. उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच मतदारांची पळवापळवी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने पूर्व विदर्भात मोठी राजकीय रणनीती आखल्याची चर्चा असून, काँग्रेसमधील काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः भाजपचे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात हे लोकप्रतिनिधी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सिंदेवाहीसह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीत पूर्व विदर्भातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली, तरी या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.