Home Breaking News ओव्हरबर्डनमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

ओव्हरबर्डनमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

57

ओव्हरबर्डनमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान


वेकोलीला उच्च न्यायालयाचे आठ आठवड्यांत सुनावणीचे आदेश!



शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून भरपाई देण्याचे निर्देश; अॅड. दीपक चटप यांचा न्यायालयीन लढा


राजुरा / धोपटाळा : वेकोलीच्या राजुरा व धोपटाळा क्षेत्रांतर्गत ओव्हरबर्डनमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतपिकांच्या नुकसानीची स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष पाहणी करून आठ आठवड्यांच्या आत सुनावणी घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश वेकोली प्रशासनाला दिले आहेत.

या संदर्भात वेकोली कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित शेतजमिनींची प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या नुकसानीची पडताळणी करणे, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि नियमानुसार नुकसानभरपाई देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी न्यायालयीन लढा उभारून त्यांच्या नुकसानीला न्याय मिळवून देण्यासाठी अॅड. दीपक चटप यांनी पुढाकार घेतला आहे. ओव्हरबर्डनमुळे शेती आणि पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी हा लढा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

“शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, त्यांच्या नुकसानीला न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घेणार नाही,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

या चर्चेप्रसंगी लहूभाऊ चहारे, शंकर पारखी, देवानंद भांडारकर, प्रकाश मोहुर्ले, रवी चापले, यशवंत वांडरे यांच्यासह इतर सहकारी व शेतकरी मित्रपरिवार उपस्थित होता.

वेकोलीच्या ओव्हरबर्डनचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आता न्यायालयाच्या आदेशामुळे नुकसानभरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, वेकोली प्रशासन या आदेशाची कितपत तत्परतेने अंमलबजावणी करते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here