बंगालमध्ये हुकूमशाहीचा अंत आणि लोकशाहीचा उदय! – विवेक बोढे
*आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पश्चिम बंगालच्या विजयाचा जल्लोष.
फटाक्यांची आतिशबाजी व लाडू वाटून आनंद साजरा
घुग्घुस, ०४
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन केल्याच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी सायंकाळी घुग्घुस येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे विजयाचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे जिल्हा महामंत्री व नगरसेवक विवेक बोढे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिशबाजी करत आणि एकमेकांना लाडू भरवून हा आनंदोत्सव साजरा केला.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यात पश्चिम बंगालमधील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट होताच घुग्घुसमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी बोलताना विवेक बोढे म्हणाले की, पश्चिम बंगालचा हा निकाल केवळ एका पक्षाचा विजय नसून तो तेथील पीडित जनतेचा आणि भारतीय लोकशाहीचा विजय आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये जी हुकूमशाही आणि दहशतीची राजवट पसरवली होती, तिला जनतेने मतपेटीतून चोख प्रत्युत्तर दिले असून आज खऱ्या अर्थाने बंगालमध्ये लोकशाहीचा सूर्योदय झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बंगालमध्ये लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत होती. भाजप कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि दहशतीचे वातावरण झुगारून तिथल्या सामान्य माणसाने विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजनावर जनतेने टाकलेला विश्वास दर्शवते. या निकालाने हे सिद्ध केले आहे की, लोकशाहीत अहंकाराला स्थान नाही; शेवटी विजय हा जनतेचाच होतो, असेही बोढे यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरत, बंगालमधील या परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम आगामी काळात संपूर्ण देशाच्या राजकारणावर दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आनंदोत्सवात भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, रत्नेश सिंग, सुरेंद्र भोंगळे, धनराज पारखी, हसन शेख, मधुकर धांडे, सुरेंद्र जोगी, सचिन नांदे, प्रणय काटवले, बबलू सातपुते, रज्जाक शेख, बंटी आगदारी, हनुमान खडसे, शंकर सिद्दम, सुधाकर आसुटकर, नितीन जाधव, मोहन धोटे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उत्सवाने संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी दणाणून गेला होता.