कोलाम समाजाचा सर्वांगीण विकास आणि न्यायासाठी आमचा लढा; प्रसिद्धीसाठी नव्हे तर परिवर्तनासाठी! – सौ. इंदिरा बोंदरे
चंद्रपूर,
“कोलाम समाज हा निसर्गाशी नातं सांगणारा आणि अत्यंत स्वाभिमानी समाज आहे. मात्र, आजही हा समाज अनेक मूलभूत हक्क आणि सोयी-सुविधांपासून वंचित आहे. आमचा संघर्ष हा स्वतःच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी नसून, समाजातील शेवटच्या अन्यायग्रस्त घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे,” असे परखड मत शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सौ. इंदिरा बोंदरे यांनी व्यक्त केले.
शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या माध्यमातून कोलाम समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि शासन दरबारी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सौ. बोंदरे पुढे म्हणाल्या की, “शामा दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना आमचे मुख्य ध्येय कोलाम बांधवांचे शिक्षण, आरोग्य, जमीन अधिकार आणि रोजगाराचे प्रश्न सोडवणे हेच आहे. केवळ भाषणापुरता किंवा बॅनरपुरता आमचा लढा मर्यादित नसून, तो प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याचा आहे.”
प्रेस नोटमधील महत्त्वाचे मुद्दे:
अन्यायाविरुद्ध वज्रमुठ: कोलाम वस्त्यांवरील अतिक्रमण, जातीचे दाखले आणि वनहक्क कायद्याची अंमलबजावणी या विषयांवर तीव्र लढा उभारणार.
प्रसिद्धीचा मोह नाही: संघटनेचे काम हे केवळ फोटो काढण्यापुरते नसून, प्रत्येक कोलाम बांधवाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहे.
शामा दादांचा वारसा: कोलाम समाजाचे क्रांतिनायक शामा दादा कोलाम यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन समाज संघटित करणे.
युवा आणि महिलांवर भर: कोलाम समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवणे.
शेवटी सौ. इंदिरा बोंदरे यांनीआव्हान केले की कोलाम समाजाने संघटीत होवून आपल्या हक्काची जाणीव ठेवावी अन्याय सहन न करता सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी शामा दादा कोलाम ब्रिगेड सदैव आपल्या पाठीशी खंबीपणे उभी राहिल असा विश्वास त्यांनी चंद्रपूर जिल्हा दौरा करताना व्यक्त केला
सौ इंदिरा बोंदरे प्रदेश अध्यक्षा शामादादा कोलाम ब्रिगेड